बाप

बाप स्वाभिमानी बाणा , बाप कणखर कणा 
त्याच्या काळजात सुद्धा लाजाळूची संवेदना 
त्याची पहाडाची छाती,  त्याचे हृदय गुलाब
त्याच्या घामाच्या थेंबाना, हिऱ्यामोत्याचा रुबाब... 

बाप तलवार ढाल, बाप पेटती मशाल 
बाप जागतो म्हणून घर झोपते खुशाल 
बाप घराचा तो पाया, आई कळस त्यावर 
जेव्हा खचतो ना पाया, तेव्हा कोसळते घर... 
 
उलाढाली करतो हा बाप फक्त घरासाठी 
शिव्याशाप या जगाचे बाप घेतो सारे माथी 
घर बायको नि मुले यांना जगवन्यासाठी 
बाप होतो वेडापिसा एका एका पैश्यासाठी... 
 
बाप म्हणजे रे कसा, जसा पाण्यातला मासा 
त्याच्या डोळ्यातील थेंब कोणा दिसणार कसा? 
बाप साठवतो अश्रू, वाट पाहे त्या क्षणाची 
जन्मभराचे रडतो लेक जाताना सासरी... 

ज्याने जपले मुलांना तळहाती पाकळ्यात 
अशा बापासाठी यावी थोडी आसवे डोळ्यात... !
कवी -पांडुरंग सोनू कांबळे (B.A.in English )

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

ओलीचिंब

आमचा हि एक जमाना होता 💌